‘… तर मी ‘रामायण’ चित्रपटात कोणतेच पात्र साकारले नसते’, ‘रावणा’च्या भूमिकेबद्दल सुपरस्टार यशने केला खुलासा

Superstar Yash | सुपरस्टार यशला ‘केजीएफ’ चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. यश लवकरच ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय, बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटातही तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यशने ‘रामायण’ चित्रपटातील शूटिंगला देखील सुरुवात केली आहे. आता अभिनेत्याने त्याच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे.
नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर ‘ प्रभू श्रीराम’ आणि साई पल्लवी ‘सीता’ मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटात ‘रावण’ची भूमिका अभिनेता यश साकारत आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना यशने रावणच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. यापूर्वी असे कोणतेही पात्र साकारलेले नाही, त्यामुळे या भूमिकेसाठी खूप उत्साही असल्याचे तो म्हणाला.
एका मुलाखतीमध्ये बोलताना यश म्हणाला की, ‘माझ्यासाठी रावणची भूमिका खूप खास आहे. मी ही भूमिका कोणत्याही दुसऱ्या कारणासाठी स्वीकारलेली नाही. जर कोणी मला विचारले असते की रामायणमध्ये रावणशिवाय कोणतीही दुसरी भूमिका करशील का, तर मी नकार दिला असता. मला या पात्रातील वेगवेगळे पैलू आवडतात. रावणची भूमिका वेगवेगळ्या प्रकारे साकारता येऊ शकते.’
नितेश तिवारी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट रामायणचे शूटिंग गेल्या वर्षीच सुरू झाले आहे. रणबीर आणि साई पल्लवी यांनी त्यांचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. सध्या यश रावणच्या भूमिकेतील शूटिंग करत आहे. चित्रपटात सनी देओल देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, यश लवकरच ‘टॉक्सिक’ या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 ला मोठ्या पडद्यावर रिलीज होईल.





