Yash Dayal : यश दयालला अटक होणार? पोलिसांकडून ‘त्या’ प्रकरणात FIR दाखल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चा स्टार खेळाडू यश दयाल याच्यावर गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणीने गंभीर आरोप करत तक्रार नोंदवली आहे. तरुणीने दयालवर लग्नाचं आमिष दाखवून आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. भारतीय न्याय संहिताच्या कलम 69 अंतर्गत पोलिसांनी यश दयालविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले की, यश दयालने दीर्घकाळ लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि आर्थिक तसेच मानसिक दबाव आणला. तिने पुरावे म्हणून चॅट्स, स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फोटोंचा उल्लेख केला आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे संबंध होते, असेही तिने नमूद केले. याशिवाय, दयालचे इतर दोन-तीन मुलींशीही असेच संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी तरुणीने महिला हेल्पलाइन आणि मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवरही संपर्क साधला होता.
यश दयाल, जो यंदाच्या आयपीएलमध्ये RCB चा महत्त्वाचा खेळाडू होता आणि त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती, सध्या या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी तो गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. या प्रकरणाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, यश दयालने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.





