गणेश भक्तांसाठी ‘या’ मंडळाकडून ड्रेसकोड जारी; दीपाली सय्यद म्हणाल्या “आपल्या धर्माचा…”

अंधेरी – गणपती बाप्पाचे उद्या अर्थात 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र आगमन होणार आहे. यासाठी राज्यभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी बाप्पाचे आगमन देखील झाले आहे. मात्र अंधेरीचा राजा मंडळाने गणेशोउत्सवानिमित्त (Ganesha festival) एक नियमावली जारी केली आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली. याप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अंधेरीचा राजा मंडळाने गणेश भक्तांसाठी एक ड्रेस कोड (Dress code) जारी केला आहे. त्यासंदर्भातील मंडपाच्या आवारात एक फलक लावण्यात आला आहे. हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही. या नियमाचे पालन करणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे. अन्यथा भाविकांना दर्शन न घेताच मंदिरातून परतावे लागू शकते. मात्र तसे होऊ नये यासाठी ज्या महिला आणि पुरुष हाफ पँट आणि स्कर्ट घालून येतील त्यांना लूंगी आणि फूल पँट देण्यात येणार आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, “आपणच आपल्या देवांचा मान ठेवला पाहिजे. त्यामुळे या ज्या गोष्टी होत आहेत त्या बरोबर आहेत. प्रत्येकाने त्या गोष्टीच पालन करणं गरजेचं आहे. मी तर या गोष्टीला दुजारा देते. कारण अशा गोष्टी एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या पाहिजे. जे लोक याला विरोध करत आहेत त्यांना मी विचारते की, यात विरोध करण्यासारखे काय आहे? आपल्या धर्माचा आपणच आदर करणार नाही तर दुसरे काय करणार. त्याच्यात चुकीचं काय आहे?,” असा सवाल त्यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “हाफ जीन्स घालून जाण्यासाठी तुम्हाला दुसरे कार्यक्रम असतात तेव्हा तुम्ही ते घालू शकता. साडी आहे, सलवार कमीज आहे सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या हिंदुस्थानात खूप छान पेहराव करण्यासाठी गोष्टी आहेत. ती जागा हाफ चड्डीची नाही. त्यामुळे जे विरोध करता आहेत त्यांचा मी विरोध करते.” दरम्यान, या मंडळात गेल्या 15 वर्षांपासून हा नियम लागू करण्यात आला असून तो दरवर्षी पाळला जातो.





