Xi Jinping : मोठे देश आपापसात लढल्यास जगात अराजकता माजेल; त्रिपक्षीय बैठकीत जिनपिंग यांचा इशारा
मोठे देश आपापसात लढल्यास जगात अराजकता माजेल, असा इशारा देत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी इतिहासातून धडा घेण्याचे आवाहन केले.

Xi Jinping : मोठे देश आपापसात लढल्यास जगात अराजकता माजेल, असा इशारा देत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी इतिहासातून धडा घेण्याचे आवाहन केले. अणुयुद्ध कधीही जिंकले जाऊ शकत नाही आणि ते लढलेही जाऊ नये. ते रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, चीन-अमेरिका संबंधांना मोठा धक्का बसू नये यासाठी अमेरिकेने तैवानच्या मुद्द्यावर योग्य पावले उचलावीत, असेही शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी म्हटले आहे.
अण्वस्त्रमुक्त जग निर्माण करण्यासाठी अण्वस्त्रांवर पूर्णपणे बंदी घालून ती नष्ट केली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी शेनझेन येथे पार पडलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठक घेतली. ट्रम्प यांनी या भेटीचे वर्णन एक ऐतिहासिक संधी असे केले आहे.
या बैठकीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आपण खरोखरच इतिहास घडवत आहोत. पृथ्वीवरील अण्वस्त्रांची संख्या कशी कमी करता येईल आणि या शस्त्रांच्या वापराचा धोका कसा कमी करता येईल, यावर चर्चा करण्याच्या स्थितीत अमेरिका, रशिया आणि चीन हे तिन्ही देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, तिन्ही नेते जगासमोर असलेल्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील आणि अण्वस्त्र कपातीबाबत या तीन देशांवर विशेष जबाबदारी आहे. मतभेद असूनही संवाद साधणे महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, संधी नाकारून कधीही शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. जिनपिंग यांनी ट्रम्प आणि पुतिन यांच्यासोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, प्रमुख देशांमध्ये चांगले संबंध असणे हा पर्याय नसून ती काळाची गरज असल्याचे जिनपिंग यांनी सांगितले. तिन्ही देशांनी एकत्र येऊन जागतिक शांतता आणि स्थिरतेचे रक्षण केले पाहिजे, तसेच जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
रचनात्मक सहकार्यातून स्थिरता: व्लादिमीर पुतिन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, रशिया, चीन (Xi Jinping) आणि अमेरिका रचनात्मक सहकार्याच्या माध्यमातून जागतिक स्थिरता अधिक मजबूत करू शकतात. दुभाष्याच्या माध्यमातून बोलताना पुतिन यांनी नमूद केले की, जगात शांतता आणि सुरक्षा राखण्याची संयुक्त जबाबदारी या तिन्ही देशांची आहे. यासोबतच नेत्यांनी ऊर्जा सुरक्षेसह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






