Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग वॉशिंग्टनमध्ये दाखल; ट्रम्प यांच्याकडून भव्य स्वागत
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेरीलँडमधील जॉइंट बेस अँड्र्यूज येथे त्यांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले.

Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेरीलँडमधील जॉइंट बेस अँड्र्यूज येथे त्यांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले. शी यांच्यासोबत चीनच्या प्रथम महिला पेंग लियुआन होत्या. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ट्रम्प आणि शी यांच्यातील ही दुसरी शिखर परिषद आहे.
जिनपिंग (Xi Jinping) आणि पेंग यांचे विमान स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी ५.३९ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनूसार पहाटे 3.31 मिनिटे) विमानतळावर उतरले. काही वेळानंतर दोघे विमानातून खाली आल्यानंतर ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी २१ सदस्यांचे सन्मान पथक, अमेरिकन हवाई दलाचा बँड आणि औपचारिक तोफांची सलामी देण्यात आली.
अमेरिका आणि चीनची राष्ट्रगीतेही वाजवण्यात आली. त्यानंतर जिनपिंग आणि पेंग मोटारींच्या ताफ्यातून रवाना झाले, तर ट्रम्प दांपत्य मरीन वन हेलिकॉप्टरने व्हाईट हाऊसकडे परतले.
गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. अमेरिका-चीन व्यापार संबंध, आयात शुल्क, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लष्करी संवाद, तैवानला अमेरिकेकडून होणारी शस्त्रविक्री, पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्ध यांसह अनेक विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे. अंतराळातील वाढती शस्त्रास्त्र स्पर्धाही चर्चेचा भाग ठरू शकते.
औपचारिक राजभोजन
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी अमेरिका आणि चीनमधील संबंध २१व्या शतकाची दिशा ठरवणारे असल्याचे म्हटले. दोन्ही देशांमध्ये अनेक गंभीर मतभेद असले तरी सर्वोच्च नेतृत्वाने परस्पर संवाद कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संवादाचा अभाव दोन्ही देशांसाठी आणि व्यापक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी अडचणी निर्माण करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
जिनपिंग यांच्या सन्मानार्थ गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक राजभोजन आयोजित करण्यात आले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संवाद कायम ठेवण्यावर भर
शुक्रवारी जिनपिंग (Xi Jinping) आणि पेंग यांची ट्रम्प दांपत्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये खासगी चहापानाची बैठक होणार आहे. त्यानंतर जिनपिंग राष्ट्रीय अभिलेखागाराला भेट देतील. या दौऱ्यात अमेरिका-चीन संबंधांतील मतभेदांवर चर्चा करण्यासोबतच दोन्ही देशांमधील संवाद कायम ठेवण्यावर भर राहण्याची अपेक्षा आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर मतभेद कायम असताना ही भेट होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या चर्चेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.






