India-China relations : मोदी-शी जिनपिंग यांची भेट; भारत-चीन संबंधांवर नेमकं काय ठरलं?
India-China relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीत सीमा शांतता, व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि ब्रिक्समधील सहकार्यावर चर्चा झाली.

India-China relations : भारत आणि चीनमधील मतभेद चर्चेतून सोडवले पाहिजेत. हे मतभेद वादात बदलू नयेत, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेल्या भेटीत सहमती झाली. ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या शी जिनपिंग यांची भारताच्या भूमीवर जवळपास सात वर्षांनंतर मोदी यांच्याशी द्विपक्षीय भेट झाली.
दोन्ही नेत्यांनी भारत-चीन संबंधांचा दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यावर भर दिला. परस्पर सन्मान, संवेदनशीलता आणि हित या तीन तत्त्वांवर संबंध पुढे नेण्याची गरज मोदी यांनी व्यक्त केली.
सीमेवरील शांततेला प्राधान्य –
भारत-चीन सीमेवरील शांतता आणि स्थैर्य हा चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता. सीमेबाबत झालेल्या करारांचे आणि सहमतीचे पालन दोन्ही देशांनी करावे, असे मोदी यांनी सांगितले. सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मान्य होईल असा न्याय्य आणि योग्य तोडगा काढण्याच्या प्रयत्नांनाही दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
व्यापारातील असमतोलावरही चर्चा –
दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणुकीतील अडचणी, पुरवठा साखळी आणि बाजारपेठेतील प्रवेश यावर चर्चा केली. भारत-चीन नागरिकांमधील संपर्क, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रवास वाढविण्यावरही भर देण्यात आला.
ब्रिक्समध्ये सहकार्य वाढवण्याचे आवाहन –
शी जिनपिंग यांनी भारत आणि चीनने ब्रिक्समध्ये सहकार्य मजबूत करावे, असे आवाहन केले. दोन्ही देशांनी समान हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर एकत्र काम करण्याची गरजही व्यक्त केली. मोदी यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाला चीनने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.




