BRICS Summit: शी जिनपिंग भारतात दाखल; BRICS परिषदेत आज काय घडणार?
BRICS Summit BRICS परिषदेसाठी विविध सदस्य देशांचे नेतेही भारतात पोहोचत आहेत. दिल्लीतील भारत मंडपम येथे या परिषदेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

BRICS Summit: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी भारतात दाखल झाले. दिल्लीतील पालम विमानतळावर त्यांच्या विमानाचे लँडिंग झाले. BRICS परिषदेसाठी विविध सदस्य देशांचे नेतेही भारतात पोहोचत आहेत. दिल्लीतील भारत मंडपम येथे या परिषदेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास BRICS देशांचे इतर नेते भारत मंडपम येथे पोहोचतील. त्यानंतर दुपारी अडीच वाजता BRICS शिखर परिषदेच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. यावेळी ‘समावेशक जागतिक शासन आणि बहुपक्षीयता मजबूत करणे’ या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जागतिक पातळीवरील सहकार्य, विविध देशांमधील संबंध आणि बहुपक्षीय व्यवस्थेला अधिक मजबूत करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.
यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता BRICS देशांचे नेते ‘भारत इनोव्हेट्स’ या प्रदर्शनाला भेट देतील. भारतातील तंत्रज्ञान, नवकल्पना आणि विविध क्षेत्रांतील प्रगतीची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता भारत मंडपमच्या लॉनमध्ये BRICS सदस्य देशांचे नेते एकत्रितपणे वृक्षारोपण करतील. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता भारत मंडपमच्या लेव्हल-३ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने BRICS नेत्यांसाठी विशेष ‘गाला डिनर’चे आयोजन करण्यात आले आहे.

Xi Jinping
मोदींच्या इथिओपिया आणि मलेशियाच्या नेत्यांसोबत बैठका
BRICS परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपिया आणि मलेशियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. या बैठकीत दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा झाली.
भारत सरकारच्या सूत्रांनुसार, इथिओपिया आणि मलेशियाने भारतासोबत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच भारताकडून संरक्षण उपकरणांची खरेदी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
भारत आणि इथिओपियामधील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वाढवण्यावरही भर देण्यात आला. इथिओपियाने भारतीय कंपन्या आणि गुंतवणुकीचे स्वागत केले आहे. विशेषतः भारतीय खाण कंपन्यांसाठी इथिओपियामध्ये उपलब्ध असलेल्या संधींबाबत चर्चा झाली.
मलेशियासोबतही विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. विशेषतः सेमीकंडक्टर क्षेत्रातील संधी आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान सहकार्य यावर बैठकीत विचार झाला.
दरम्यान, शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याकडेही जगाचे लक्ष लागले आहे. BRICS परिषदेमुळे भारत, चीन आणि इतर सदस्य देशांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या परिषदेत होणाऱ्या चर्चेकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाने पाहिले जात आहे.





