SA vs WI : द. आफ्रिकेच्या विजयाने WTC Points Table मध्ये उलटफेर…! पाकिस्तानला मोठा धक्का तर टीम इंडियाचे..

World Test Championship 2023-2025 Points Table : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी 40 धावांनी जिंकली. या विजयामुळे आफ्रिकेने 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली. दुसऱ्या कसोटीतील विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियालाही धक्का बसला आहे का? आफ्रिकेच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते जाणून घेऊया….
आफ्रिकेने पाकिस्तानला टाकले मागे…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला मागे टाकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. आफ्रिकेने 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चक्रात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 2 जिंकले, 3 गमावले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. तर पाकिस्तानने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आणि 3 हरले आहेत. आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 38.89 आहे, तर पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 36.66 आहे. पाकिस्तानला 21 ऑगस्टपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी जिंकून पाकिस्तानी संघ दक्षिण आफ्रिकेला पुन्हा पिछाडीवर टाकू शकतो.
Will 🇿🇦, who have home series against Sri Lanka and Pakistan and an away series against Bangladesh left, challenge for the top two spots? #WIvSA pic.twitter.com/nvsiacyPza
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 18, 2024
भारतीय संघाचे नुकसान झाले का?
दक्षिण आफ्रिकेच्या मालिका विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीआधीही टीम इंडिया अव्वल स्थानावर होती, तर या सामन्यानंतरही टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारतीय संघाने चालू चक्रात आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले, 2 हरले आणि 1 अनिर्णित राहिला. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.51 आहे.
SA vs WI : द. आफ्रिकेचा ऐतिहासिक मालिका विजय, भारतासह ऑस्ट्रेलियाचाही मोठा विक्रम काढला मोडित….
टेबलमधील टॉप-5 संघ….
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. पुढे जाताना न्यूझीलंड तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या विजयाची टक्केवारी प्रत्येकी 50-50 टक्के इतकी आहे. तर दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 38.89 आहे. गुणतालिकेत पाकिस्तान (36.7), इंग्लंड (36.5), बांगलादेश (25.0) आणि वेस्टइंडिज (18.5) हे संघ अनुक्रमे सहा, सात, आठ आणि नवव्या स्थानावर आहेत.





