#WTC2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, WTC Final मध्ये भारताचा पुन्हा मानहानीकारक पराभव

इंग्लंड :- ऑस्ट्रेलियाने भारताला दुस-या डावात 234 धावांवर गुंडाळत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 209 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यासह सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर भारताला सलग दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह भारताचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ कायम आहे. टीम इंडियाने गेल्या 10 वर्षात एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. यापूर्वी 2013 साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ट्रॅव्हिस हेडने 163 आणि स्टीव्ह स्मिथने 121 धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 296 धावा करू शकला. अजिंक्य रहाणेच्या 89, शार्दुल ठाकूरच्या 51 आणि रवींद्र जडेजाच्या 48 धावांनी भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव आठ गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा करून घोषित केला. अॅलेक्स कॅरीने नाबाद 66 धावा केल्या. पॅट कमिन्स आणि मार्नस लबुशेन यांनी प्रत्येकी 41धावा केल्या. या सामन्याच्या चौथ्या डावात भारतासमोर 444 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 234 धावांवर गारद झाला.
विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने 46 आणि रोहितने 43 धावांचे योगदान दिले. यासह टीम इंडियाला अंतिम सामना 209 धावांनी गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात मिचेल स्टार्कने चार, पॅट कमिन्सने चार, स्कॉट बोलंडने पाच, कॅमेरॉन ग्रीनने दोन आणि नॅथन लियॉनने पाच बळी घेतले. त्याचबरोबर भारताकडून मोहम्मद शमीने चार, मोहम्मद सिराजने पाच, उमेश यादवने दोन, शार्दुल ठाकूरने दोन आणि रवींद्र जडेजाने चार बळी घेतले.





