गुगल मॅप्समुळे चुकीच्या घरात पोहोचले वऱ्हाड; घरात आला भलताच नवरा

इंडोनेशियातील घटना : वऱ्हाड पोहोचले त्या घरातही होते लग्न

बाली (इंडोनेशिया) – गुगल मॅप्सवर अतिरिक्त विश्‍वास ठेवणे महाग पडल्याच्या अनेक घटना आपण वाचतो. कधी कोणी रस्ता चुकून स्मशानात गेल्याचे दिसते तर कधी कोणाची कार धरणाच्या पाण्यात पडल्याचे समजते. गुगल मॅप्सवर विसंबणे इंडोनेशियातील एका वराला असेच महागात पडले असते आणि चुकीच्या वधुच्या गळ्यात माळ घालण्याची वेळ त्याच्यावर आली असती. मात्र, सुदैवाने हा प्रसंग टळला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

इंडोनेशियाच्या मध्य जावा येथील एक अभियंता तरुण लोसारी नावाच्या गावी निघाला होता. तेथे त्याची वाग्दत्त वधु विवाहासाठी त्याची प्रतिक्षा करत होती. त्यामुळे आपले मित्र आणि नातेवाईकांसह या वराने वऱ्हाडासह लोसारीच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. मात्र, घरातील कोणीच लोसारला वधुच्या घरी गेलेले नसल्याने त्यांनी गुगल मॅप्सचा आधार घेतला.

मात्र, नक्की काय झाले आणि दिशा कशी चुकली ते कोणालाच कळाले नाही. हे वऱ्हाड गुगल मॅप्सनुसार पोहोचला लोसारी गावातल्या भलत्याच घरी, जिथे मारिया अल्फा नावाच्या मुलीचा विवाह व्हायचा होता आणि तिचे कुटुंबियही वऱ्हाडाची प्रतिक्षा करत होते. अचानक वेळपूर्वी आलेले वऱ्हाड पाहून मारियाच्या घरचे गोंधळून गेले आणि गडबडीतच तिच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांचे स्वागत केले, न्याहारी केली व पाणी आणि भेटवस्तू एकमेकांना दिल्या.

दरम्यान, थोडीशी शंका आल्याने मारियाने तिचा वाग्दत्त वर असलेल्या बुरहान सिद्दीकीशी मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा मारियाला समजले की बुरहान सिद्दीकी आणि त्याचे पूर्ण वऱ्हाड अद्याप वाटेत थांबले असून, त्यांना मारियाच्या घरी पोहोचायला किमान दोन तास लागणार होते. हे समजताच चुकून घरात आलेल्या आगंतुक वऱ्हाडाला मारियाच्या कुटुंबियांनी निरोप दिला, भेटवस्तू परत घेतल्या आणि अखेर खराखुरा वर घरी आल्यावर मारिया आणि बुरहानची लगीनगाठ बांधली गेली.

 

 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीचे कुटुंब त्याच्या भेटी परत चुकीच्या घराबाहेर पडताना दिसत आहे. त्यात उपस्थित लोक एकमेकांना अभिवादन करीत आहेत आणि हसताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.