पैलवान सिकंदर शेखला अखेर जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

Sikandar Shaikh | महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला पंजाबमधील शस्त्र तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला केलेल्या अटकेमुळे कुस्ती वर्तुळात गोंधळ उडाला होता. पंजाबमधील पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती. मात्र आता सिकंदरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिकंदर शेखच्या नावावर या आधी कोणताही गुन्हा नव्हता, तसेच तो देशाचा मोठा पैलवान असल्याचे लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. “महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल. या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी खुप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच सिकंदरच्या वकिलांनी त्याची बाजू व्यवस्थितपणे मांडून त्याला जामीन मिळवून दिला, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार,” असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे. Sikandar Shaikh
महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल. या संपूर्ण प्रकरणात…
— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2025
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी सिंकदर शेख याला न्याय मिळण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. सिकंदर शेख अटकेप्रकरणी दुपारपर्यंत योग्य माहितीसह उत्तर देण्याचं आश्वासन पंजाब मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना दिलं होते. त्यानंतर आता सिंकदरला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तिघांचा जामीन नामंजूर
दरम्यान, पंजाब पोलिसांच्या पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करत चार जणांना अटक केली होती. त्यात सिकंदर शेखचाही समावेश होता. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ९९ हजार रुपये रोख रक्कम, पाच पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार आरोपींपैकी सिकंदर शेखला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित तीन जणांवर या आधी खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. Sikandar Shaikh
हेही वाचा :
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! भारतीय वंशाच्या जोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड





