चिंताजनक! जगभरात गोवरचा प्रादुर्भाव वाढला; मृत्यूंची संख्या 50 टक्क्यांनी वाढली

जीनिव्हा – लहान वयात होणाऱ्या गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 2016 साली तब्बल 50 टक्क्यांनी वाढले आहे. यावर्षी आलेल्या करोना विषाणूच्या साथीदरम्यान गोवरच्या मृत्यूचे हे प्रमाण आणखीनच लक्षणीय वाढले आहे.
गेल्या वर्षी जगभरात तब्बल 2 लाख गोवरमुळे मृत्युमुखी पडले आहेत. ही स्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक बनली आहे, असे “युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड’ अर्थात “युनिसेफ’ने म्हटले आहे.
“करोना विषाणूची आपत्ती ओढवण्यापूर्वीच जगावर गोवरची आपत्ती आलेली होती. ही आपत्ती अद्याप दूर झालेली नाही.’ असे “युनिसेफ’च्या कार्यकारी संचालिका हेन्रीटा फोर यांनी म्हटले आहे. कोविड-19 च्या आपत्तीमुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला आहे. एका रोगाविरोधात लढत असताना दुसऱ्या रोगाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे आज प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात फोर यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या गोवरविषयीच्या अहवालाचा तपशील या निवेदनात देण्यात आला आहे. 2019 मध्ये गोवरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2 लाख 7 हजार 500 इतकी झाली होती. ही संख्या गेल्या 23 वर्षातील सर्वाधिक आहे. 2016 पासून गोवरामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे.
2020 या चालू वर्षात गोवरामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी आहे. कोविड-19 च्या साथीमुळे आरोग्य यंत्रणेवर आलेल्या ताणामुळे गोवर प्रतिबंधासाठीच्या लसीकरणाच्या प्रयत्नांवरही मर्यादा आल्या आहेत. सध्या 26 देशांमध्ये तब्बल 9 कोटी 40 लाख नागरिकांना गोवर प्रतिबंधक लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे गोवराचा धोका अजूनही शेकडो जणांना आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
या 26 देशांमध्ये ब्राझील, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, कॉंगो, इथिओपिया, नेपाळ, नायजेरिया, फिलीपाईन्स आणि सोमालिया या 8 देशांमध्ये आता गोवर प्रतिबंधक लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.





