वरळी हिट अँड रन प्रकरणात ‘ही’ धक्कादायक अपडेट आली समोर

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपघात झाल्याचं माहिती असतानाही तसंच कावेरी नाखवा यांना बाजूला केल्यानंतरही त्यांच्या अंगावर गाडी चढवली गेली, असा खळबळजनक दावा मुंबई पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर बीएमडब्ल्यूचं चाक आणि बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी नाखवा यांना मिहिर शाह आणि राजऋषी बिडावत यांनी बाजूला काढलं होतं. यानंतर कावेरी यांच्या अंगावरून गाडी नेण्यात आली असल्याचा खुलासा पोलिसांनी कोर्टात केला आहे.
राजेश शाह यांना जामीन मंजूर
वरळी हिट अँड रन प्रकरणात 1,735 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने या प्रकरणी मिहिर शाहचे वडील राजेश शाह यांना जामीन मंजूर केला आहे, तर मिहीर शाह अजूनही फरार असून त्याचा शोध सुरु आहे. 15 हजार रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर राजेश शाह यांना शिवडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तसेच दरम्यान चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
ॲट्रिया मॉलजवळील एक कोळी दाम्पत्य प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. मात्र महिलेचा पती बाजूला पडला तर, महिलेला चालकाने फरफटत नेले. यात महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता.




