वरळी हिट अँड रन प्रकरण ! आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीला कोणी मदत केली याच तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती.
गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबरप्लेटची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती आरोपी देत नाही. तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. गुन्ह्यातील कार ही कोणाची आहे, ती त्याला कुणी वापरायला दिली याचाही तपास होणे गरजचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपी कुठल्याही थराला जावू शकतात. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे. वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.


