डॉक्टरांची कमाल! डुकराचं हृदय ‘ट्रान्सप्लांट’ करत वाचवला रुग्णाचा जीव

अमेरिकेतील डॉक्टरांनी डुकराचे हृदय ट्रान्सप्लांट करत एका रुग्णाचा जीव वाचवला आहे. डेव्हिड बेनेट असं या रुग्णाचे नाव असून ते ५७ वर्षांचे आहेत. बेनेट यांच्यावर नऊ तास चाललेल्या हृदयप्रत्यारोपणाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये डुकराचे जनुकीय बदल करण्यात आलेले हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. शुक्रवारी बेल्टिमोर येथील मेरीलँड मेडिकल सेंटर विद्यापीठात पार पडलेल्या या शस्त्रक्रियेनंतर बेनेट यांची प्रकृती स्थिर आहे.
बेनेट यांच्या शरीराने डुकराच्या हृदयाशी मिळते-जुळते घ्यावे यासाठी त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. डॉक्टरांनी डुकराच्या हृदयातील पेशींमधील शर्करा काढून टाकल्याने बेनेट यांच्या शरीराने ते स्वीकारले असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
सध्या बेनेट हे स्वतः श्वासोश्वास करू शकत असून नव्या हृदयाने संपूर्ण शरीरात रक्त प्रवाहित करावे यासाठी वैद्यकीय उपकरणांची मदत घेण्यात येत आहे. मात्र बेनेट यांच्या शरीराने प्रत्यारोपित हृदय पूर्णपणे स्वीकारले आहे की नाही? हे आताच सांगणं घाईचं ठरेल असं तज्ज्ञ सांगतात. सर्व वैद्यकीय उपकरणे काढून टाकल्याच्या काही आठवड्यांनंतर बेनेट यांच्या शरीराने ते स्वीकरले आहे की नाही हे कळेल.
मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यास हा वैद्यकीय क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार असून यापद्धतीने अमेरिकेमध्ये हजारो जीव जाऊ शकतील असा आशावाद तज्ज्ञांनी केला आहे. हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आलेले बेनेट हे पेशाने मजूर असून ही शस्त्रक्रिया जीवघेणी ठरू शकते हे त्यांना माहिती होत.
बेनेट यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याने ते इतर मनुष्याचे हृदयप्रत्यारोपीत करण्यासाठी पात्र नव्हते. अशातच त्यांच्यावर डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेनेट यांना याची कल्पना देण्यात आली तेव्हा त्यांनी ही जोखीम पत्करत शास्त्रक्रियेस होकार दिला.





