World University Chess Championship 2024 : आकांक्षा हगवणेचे सोनेरी यश…

World University Chess Championship 2024 : – भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या आकांक्षा हगवणे (Aakanksha Hagawane)हिने जागतिक आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धा दिनांक २५ ते ३० जून दरम्यान युगांडा मधील अँटेबे येथे पार पडल्या. आकांक्षा ही भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये इंग्लिश या विषयांमध्ये पीएचडी करत आहे.
आकांक्षाने स्पर्धेत एकूण 9 फेऱ्या खेळल्या आणि 4 फेऱ्या जिंकल्या आणि 5 फेऱ्या ड्रॉ केल्या. पहिल्या फेरीत आकांक्षा बोत्सवानाच्या त्शेपिसो स्मिथविरुद्ध खेळली आणि जिंकली. दुसऱ्या फेरीत ती श्रीलंकेच्या तरुशी निकलेशासोबत खेळली आणि जिंकली. आकांक्षा हगवणे ही जागतिक आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत सुवर्णपदक मिळवणारी ही एकमेव भारतीय महिला ठरली आहे. तसेच ती भारताची पहिली आणि एकमेव सोळा वर्षाखालील विश्वविजेती आहे. तसेच तिला महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती या क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आकांक्षा ने आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदके मिळवली आहेत. याअगोदर तिने भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये आय. ई. एस. विद्यापीठ भोपाळ येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तसेच या शैक्षणिक वर्षांमध्ये एच. एस. एन. सी. विद्यापीठ मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आकांक्षाने सुवर्णपदक मिळवले होते.
आकांक्षाच्या या यशाबद्दल भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम , भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक साऊजी, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव , भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी. जयकुमार, भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. सुहास मोहिते व डॉ . राजेंद्र मोहिते, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. स्पप्नील विधाते तसेच भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक केतन खैरे यांनी आकांक्षाचे अभिनंदन केले.





