जग मंदीच्या विळख्यात अडकले आहे का? ‘या’ प्रसिद्ध लेखकाने केला मोठा दावा

Robert Kiyosaki | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून जगभरात आर्थिक अनिश्चितता पाहायला मिळत आहे. जगभरातील शेअर मार्केटवर याचा परिणाम दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वीच रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होणार असल्याचे म्हटले होते. आता कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जग मंदीच्या विळख्यात अडकले असल्याचा दावा केला आहे.
कियोसाकी यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत जगभरात मंदीची लाट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, जगात मंदीमध्ये आहे का? माझे उत्तर ‘हो’ असे आहे. 2012 मध्ये ‘रिच डॅड्स प्रोफेसी’ लिहिल्यापासून लोकांना सतत चेतावणी देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे त्यांनी लिहिले की, “शिकण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी खूप उशीर झाला आहे का?” यावर उत्तर देताना ते म्हणाले, “नाही.” पण वेळ तुमच्या बाजूने आहे आणि वेळ ही नेहमीच एक संपत्ती आहे.
शाळा आणि पारंपरिक शिक्षणामुळे लोकांमध्ये चुका करण्याची भीती निर्माण होते, असेही ते म्हणाले. त्यांनी लोकांना स्वतःला शिक्षित करण्यासाठी युट्यूबची मदत घेण्याचा सल्ला दिला.
Is The WORLD in a RECESSION?
I say “Yes.” And I have been doing my best to warn people since I wrote Rich Dad ‘s Prophecy in 2012.
Q: Is it too late to learn and make changes?
A: NO. But time on your side and time is always an asset to you.
In my previous X I compared…
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) March 26, 2025
त्यांनी पुढे लिहिले की, सत्य हे आहे की जग मंदीत आहे. सत्य हे आहे की महागाई वाढत आहे आणि बेरोजगारी देखील वाढत आहे. मात्र, या मंदीबाबत तुम्ही काय करू शकता? ही मंदी तुम्हाला श्रीमंत करणार की गरीब? हा निर्णय पूर्णपणे तुमचा असेल.
स्वतःची काळजी घ्या. ही मंदी तुमच्यासाठी सर्वात चांगली संधी ठरू शकते व यासाठीचे सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कियोसाकी यांनी अशाच प्रकारचा इशारा दिला होता. सध्याची आर्थिक मंदी इतकी गंभीर असू शकते की त्यामुळं 1929 च्या मार्केट क्रॅश पेक्षा मोठा मार्केट क्रॅश होऊ शकतो. 1929 च्या मार्केट क्रॅशनं त्या काळी महामंदीला सुरुवात झाली होती, असे ते म्हणाले होते.





