महाक्रॅश! शेअर बाजारात होणार इतिहासातील सर्वात मोठी घसरण? 1929 ची पुनरावृत्ती होणार? प्रसिद्ध लेखकाने केले भाकीत

Share Market Crash | जगभरातील शेअर बाजारात सध्या अनिश्चितता पाहायला मिळत आहे. महागाई, मंदीचे सावट यामुळे अमेरिका, भारतासह अनेक देशातील शेअर बाजार अगदी पत्त्यासारखे कोसळत आहेत. त्यामुळे अशा स्थितीमध्ये नक्की गुंतवणूक करावी की नाही? अशी चिंता अनेकांना सतावत आहे. त्यातच आता ‘Rich Dad, Poor Dad’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी शेअर बाजारात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते असे म्हटले आहे. तसेच, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे स्टॉक मार्केट क्रॅश असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित महामंदीची शक्यता वर्तवली आहे. तसेच, बाजारातील क्रॅश 1929 च्या क्रॅशपेक्षाही मोठे असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
कियोसाकी यांनी लिहिले की, फुगा फुटत चालला आहे. मला भीती वाटते की हा इतिहासातील सर्वात मोठा क्रॅश असू शकतो. दुर्दैवाने आपल्या असक्षम नेत्यांनी आपल्याला एका सापळ्यात ओढले आहे… प्रचंड मोठी घसरण. मी या क्रॅशबद्दल माझ्या ‘रिच डॅड्स प्रोफेसी’ या पुस्तकात लिहिले आहे.
THE EVERYTHING BUBBLE is bursting. I am afraid this crash may be the biggest in history.
Germany, Japan, and America have been the engines up to now.
Unfortunately our incompetent leaders led us into a trap….giant crash.
I wrote about this crash in my book RICH DAD’s…
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) March 11, 2025
त्यांनी पुढे लिहिले की, हा क्रॅश 1929 पेक्षाही मोठा असणार आहे, एक क्रॅश ज्यामुळे महामंदी आली. अस्वस्थ होणे आणि भीती वाटणे सामान्य आहे, पण घाबरू नका. शांत राहा, खोल श्वास घ्या, डोळे उघडे ठेवा आणि तोंड बंद ठेवा. लाखो लोकांचे नुकसान होईल. परंतु तुम्हाला त्यापैकी एक असण्याची गरज नाही.
2008 मध्ये, मी प्रतिक्षा केली. सर्व शांत होऊ दिले. त्यानंतर उत्तम संधी शोधली. थोडक्यात, जग ज्या संकटातून जात आहे. ही तुमच्या आयुष्यातील संधी ठरू शकते. कितीही अशांत परिस्थिती आली तरी स्तब्ध रहा आणि शांत राहा. मी रिअल इस्टेट, सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करत राहीन…. विक्रीसाठी, असेही ते पुढे म्हणाले.
जगभरात शेअर मार्केटमध्ये पडझड सुरू असताना कियोसाकी यांनी केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगात व्यापार युद्ध सुरू झाले असतानाच रॉबर्ट कियोसाकी यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकन शेअर बाजारातही प्रचंड घसरण दिसून येत आहे. त्यामुळे अनेक तज्ञांनी मंदीची भीती पुन्हा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.





