World Hindu Foundation : बॅंकॉकमध्ये होणार जागतिक हिंदू अधिवेशन

नवी दिल्ली :- जगभरातील हिंदुत्ववादी संघटनांचे अधिवेशन नोव्हेंबरमध्ये बॅंकॉकमध्ये होणार आहे. हिंदू समुदायासमोरील आव्हाने आणि संधींबाबत या परिषदेत चर्चा होणार आहे.
“वर्ल्ड हिंदू फौंडेशन’च्यावतीने 3 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून हे अधिवेशन 24 नोव्हेंबर रोजी बॅंकॉकमधील कन्व्हेंशन सेंटरमध्ये सुरू होणार आहे, असे संघटनेचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि विश्व हिंदू परिषदेचे सह सचिव स्वामी विज्ञानानंद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया खंडांव्यतिरिक्त आणि ऑस्ट्रेलियासह एकूण 60 देशांमधील प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये विविध देशांमधील हिंदू समाजातील उद्योजक, व्यवसायिक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असणार आहे. यापूर्वी 2014 साली दिल्लीमध्ये आणि 2018 साली शिकागो येथे जागतिक हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.





