Myanmar News : म्यानमार लष्कराकडून बंडखोरांच्या गावावर हवाई हल्ला; 24 जण ठार

बँकॉक : म्यानमारच्या लष्कराने सोमवारी रात्री एका गावावर केलेल्या हल्ल्यात लहान मुले आणि महिलांसह किमान २४ जण ठार झाले. तर ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. बंडखोर गटाच्या सदस्यांनी, गावकऱ्यांनी आणि स्थानिक प्रसार माध्यमांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी रात्री लष्कराने मोटर पॅराग्लायडरच्या सहाय्याने देशाच्या मध्यभागातील सागाइंग भागातल्या बॉन तो गावावर हल्ला केला. हे गाव देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेच्या पश्चिमेला ९० किलोमीटर अंतरावर आहे.
या गावामध्ये बौद्ध महोत्सव साजरा केला जात होता. सोमवारी संध्याकाळी बॉन तो आणि जवळच्या गावातील १०० हून अधिक गावातील लोक प्राथमिक शाळेच्या आवारात बौद्ध उपवासाच्या समाप्तीनिमित्त तेलाचे दिवे लावण्यासाठी जमले होते. म्यानमारच्या लष्करी शासनाच्या ताब्यात असलेल्या राजकीय कैद्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी या गावात रॅली देखील आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला.
एका मोटार चालवलेल्या पॅराग्लायडरने संध्याकाळी ७:१५ वाजता दोन बॉम्ब टाकले. त्यामध्ये मुले, गावकरी आणि स्थानिक राजकीय कार्यकर्ते गटांचे सदस्य आणि सशस्त्र लष्करविरोधी गटांचे सदस्य असे अंदाजे २० ते ४० लोकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक प्रतिसाद गटाच्या प्रतिनिधींनी सांगितले. म्यानमारमध्ये लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान स्यू की यांच्या लोकनियुक्त सरकारविरोधात बंड पुकारून सत्ता ताब्यात घेतली होती. तेंव्हापासून म्यानमारमध्ये यादवी युद्ध सदृश स्थिती आहे. देशातील अनेक गावांवर बंडखोरांचे नियंत्रण आहे. अशा अनेक गावांवर लष्कराने असे हल्ले केले आहेत.





