Monkeypox Global Emergency: WHO ने मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून केले घोषित, व्हायरस पसरला 70 देशांमध्ये

वॉशिंग्टन – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मंकीपॉक्सला आता जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. एपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, हा विषाणू जगातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होणारा विषाणू आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम घेब्रेसस यांनी शनिवारी सांगितले की, वेगाने पसरणारा मांकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणीचे प्रतिनिधित्व करतो. जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेला सर्वोच्च पातळीचा इशारा. WHO ने जाहीर केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी आंतरराष्ट्रीय चिंतेकडे निर्देश करते.
मंकीपॉक्सवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा अर्थ असा आहे की, या विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसादाची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या हालचालीमुळे विषाणू संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी लस आणि उपचारांसाठी सामायिक सहकार्याचा मार्ग खुला होईल.
त्याचवेळी, रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) म्हणते की जगभरात मंकीपॉक्सच्या 14,000 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. आफ्रिकेत मंकीपॉक्समुळे पाच जणांचा मृत्यू झाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, स्पेन, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँड्समध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोसिस (प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरलेला विषाणू) आहे.
भारतामध्ये एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे, जी परिस्थितीवर लक्ष ठेवेल. मंकीपॅक्सने भारतातही दस्तक दिली आहे. केरळमध्ये मंकीपॉक्सचे एकूण तीन रुग्ण आढळून आले आहेत. दुसरा रुग्ण गेल्या आठवड्यात केरळच्या कन्नूर जिल्ह्यात आढळून आला होता तर पहिला रुग्ण दक्षिण केरळच्या कोल्लम जिल्ह्यात 14 जुलै रोजी आढळून आला होता. केरळ सरकारने मंकीपॉक्सबाबत एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना या SOP चे पालन करावे लागेल.





