World Cup 2023 : पाक संघाला अखेर व्हिसा मिळाला

नवी दिल्ली :- अखेर पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताचा व्हिसा मिळाला. भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकचा संघ आता गुरुवारी भारतात दाखल होणार आहे.
पाक संघ भारतासाठी रवाना होण्यापूर्वी व्हिसाबाबत प्रश्न निर्माण झाला होता, व त्यावर तोडगा काढण्यात आला असून, आता त्यांना स्पर्धेसाठी येथे दाखल होण्यास कोणताही अडचण नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.
भारतात येण्यापूर्वी पाकचा संघ दोन दिवस दुबईत सराव करणार होता. मात्र, दुबईचा व्हिसा मिळण्यातही विलंब झाल्याने त्यांच्या स्पर्धेच्या तयारीवर परिणाम होणार होता. त्यामुळे त्यांनी दुबईतील सराव शिबिरच रद्द केले. तरीही त्यांना भारताकडून व्हिसा मिळत नसल्याने त्यांचा दौरा कार्यक्रमच जाहीर करता येत नव्हता.
दरम्यान,पाकचा संघ हैदराबादमध्ये पहिला सराव सामना येत्या 29 सप्टेंबर रोजी खेळणार आहे. भारताच्या व्हिसाचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून सोडवण्यात आलेला नाही, अशा प्रकारे आम्हाला देण्यात येणारी वागणूक संतापजनक आहे, अशा आशयाचे पत्र पाक क्रिकेट मंडळाने आयसीसीचे सीईओ जॉफ अलकार्डिस यांना आयसीसी व बीसीसीआयला पाठवले होते.





