World Cup 2023 IND vs AUS Final : एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून विजय मिळवला. अशा परिस्थितीत चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. स्पर्धेत आतार्यंत सलग 10 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाची नजर आता विश्वचषकावर आहे.
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मैदानात उतरतो ते विक्रम मोडण्यासाठीच. याची पुन्हा प्रचिती विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात आली आहे. या सामन्यात विराटने सचिन तेंडूलकर याचे तीन विक्रम मोडत स्वतःचे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
1. चार उपांत्य सामने खेळण्याचा विक्रम
सचिन तेंडुलकर त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तीन विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्य फेरीचे सामने खेळला आहे. तर विराटने बुधवारी न्यूझीलंड विरूध्द उपांत्य फेरीच्या सामन्यात उतरताच सचिनचा हा विक्रम मोडून विश्वचषक स्पर्धेतील चार उपांत्य सामने खेळण्याचा विक्रम रचला. सचिन तेंडुलकर 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. तर विराट कोहली 2011, 2015,आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. बुधवारी विराटने या स्पर्धेतील चौथ्या उपांत्य सामना खेळत सचिनचा विक्रम मोडला.
2. वनडेत सर्वाधिक शतकं
न्यूझीलंड विरूध्दच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीनं 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान तर दिलेच याबरोबर विराट कोहलीने या सामन्यात अनेक विक्रम केले. रनमशीन विराट कोहलीने वानखेडेवर 50 वे शतक ठोकले. न्यूझीलंडविरोधात उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा दिला. शतकांचे अर्धशतक ठोकल्यानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. क्रिकेट, सेलिब्रेटी ते राजकारण्यांनीही विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
विराट कोहली – 50
सचिन तेंडुलकर – 49
रोहित शर्मा – 31
रिकी पाँटिंग – 30
सनथ जयसूर्या – 28
विराटने उपांत्य फेरीच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांचा विक्रम मागे टाकत आपले 50 वे शतक झळकावले आहे. आता विराट कोहली वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. यानंतर सचिन तेंडुलकरसह जगभरातील सर्व क्रिकेटपटूंनी त्याच्या कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने 49 वे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सचिनने 452 एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली होती. तर कोहलीने 279व्या डावातच 50 शतके झळकावली आहेत.
3. एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा…
तसेच या विश्वचषकात विराट कोहलीने 10 सामन्यात सर्वाधिक 711 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतक आणि 5 अर्धशतकाचा समावेश आहे. विश्वचषकाच्या एका मोसमात 700 हून अधिक धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही मागे टाकला आहे. विश्वचषकात सर्वाधिक 673 धावांचा विक्रम हा सचिनच्या नावावर होता. गेल्या 20 वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम विराटनं यंदा मोडलाय.
711 धावा – विराट कोहली (2023)
673 धावा – सचिन तेंडुलकर (2003)
659 धावा – मॅथ्यू हेडन (2007)
648 धावा – रोहित शर्मा (2019)
647 धावा – डेव्हिड वॉर्नर (2019)
तसेच, विराट कोहलीच्या नावावर आता वनडेमध्ये 13794 धावा आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत सचिन तेंडुलकर अग्रस्थानी आहे.
18426 – सचिन तेंडुलकर
14234 – कुमार संगकारा
13794*-विराट कोहली
या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.