पुणे | नव्या शैक्षणिक धोरणाबाबत कार्यशाळा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – म. ग. ए. संस्थेच्या दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, हुजूरपागा व अंतर्गत गुणवत्ता सुधारणा कक्ष गुणवत्ता सुधार कार्यक्रम व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेस वाडिया महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. मनोहर सानप, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा डॉ. मधुरा जोशी होत्या. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता पांडे, आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ. रूपाली शेठ आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता पांडे यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ. मधुरा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यशाळेत डॉ. मनोहर सानप यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाच्या साह्याने नवीन राष्ट्रीय धोरण २०२० याविषयी विद्यार्थिनी व पालकांना अतिशय समर्पकपणे माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. स्मिता पांडे यांनी केले. आभार डॉ. गुरुनाथ पवार यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. ज्योती माने यांनी केले.





