अंतर्मनाला कितीही कळवळा असला, तरी सध्याच्या जगामध्ये बाह्यमन ताकदवान झाले आहे. त्याला दुसऱ्याचे दुःख दिसत नाही, पण आज अंतर्मन जागृत असणारी माणसे येथे दैनिक “प्रभात’ व “दिशा परिवारा’च्या रूपाने आहेत. त्यांचे अंतर्मन जागृत असल्यानेच गरिबांना हात देण्याचे काम दैनिक प्रभात व दिशा परिवार करीत आहेत. समाजामध्ये जाणिवा जागृत राहिलेल्या नाहीत. न्यूनगंड वाढत आहे. धर्म, रंग, जात यानुसार समाज विभागत आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपल्या क्षमता जागृत करणे आवश्यक आहे आणि त्या करण्याचे काम दिशा परिवार आणि दैनिक प्रभात यांच्यासारखे लोक पुढे येऊन आदर्श समाज घडवत आहे, असे मत प्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार संजय कळमकर यांनी व्यक्त केले. गरिबी खूप काही शिकवते. आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते. त्यामुळे त्याचे भांडवल न करता आपल्या जाणिवा जागृत ठेवून कार्य करत राहा. अशा कार्यामध्ये कार्यरत व्यक्ती हे आधुनिक काळातील कर्ते-सुधारक आहेत, असा गौरव करून कळमकर म्हणाले की, गरिबीची लाज वाटू देऊ नका. गरिबीमध्ये जन्माला येणे पाप नाही; पण काही कर्तृत्व न करता गरिबीमध्येच मरणे पाप आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संधीची वाट पाहिली पाहिजे. संधी मिळाली की आपली क्षमता जागृत होते. विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. इतरांचे गुणदोष काढण्यापेक्षा स्वतःला ओळखा. त्यातून आपली प्रगती साधता येणार आहे.