कामगारांचा संप एक महिना लांबणीवर

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील संपाचे आवाहन केले होते. मात्र सध्याची एकूण परिस्थिती पाहता हा संप एक महिना लांबणीवर टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
आता हा संप 28 व 29 मार्च रोजी केला जाणार आहे. पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि करोनाच्या संसर्गामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कामगार संघटनानानी म्हटले आहे. संप यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरावर काम सुरू करण्यात आले होते. मात्र बऱ्याच राज्यातील कामगारांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये संप करणे योग्य होणार नसल्याचे कळविल्यानंतर हा संप लांबणीवर टाकण्यात आला.
सरकारने काही सरकारी कंपन्यातील भागभांडवल विकण्याचा किंवा या कंपन्या खासगी क्षेत्राला विकण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात या कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. आमच्या मागण्या कायम आहेत आणि त्यासाठी संप करण्यात येणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहून हा संप पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.


