पुण्यातील चांदणी चौकातील कामाला जून उजाडणार

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -चांदणी चौकातील नवीन उड्डाणपूल आणि रस्तारुंदीकरणाचे काम येत्या जून 2023 पर्यंत पूर्ण होईल. आपला भविष्यकाळ चांगला करण्यासाठी, वर्तमानकाळात थोडाचा त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र, तोही त्रास कसा कमी होईल, त्याबाबत उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या पाहणीदरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. या कोंडीचा फटका स्वत: मुख्यमंत्र्यांना बसल्यावर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली.शुक्रवारी (दि. 2) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: या चौकातील कामाची पाहणी करत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, “एनएचएआय’चे अधिकारी कदम, वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, “एनएचएआय’ सल्लागार अभियंता भारत तोडकरी यांसह अधिकारी उपस्थित होते.
चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडल्यावर वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार, पर्यायी व्यवस्था काय? याबाबत गडकरी यांना विचारले असता, ते म्हणाले, “”भविष्यात चांगले रस्ते पाहिजे म्हटल्यावर काही काळ त्रास सहन करावा लागणारच. चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर दोन महिन्यांत नवीन उड्डाणपूल उभारला जाईल. त्यामुळे नागरिकांना दोन ते अडीच महिने त्रास सहन करावा लागेल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. मात्र, हा त्रास कमी कसा होईल, याबाबत नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.”




