“कर्तुत्वाला ओळख सांगावी लागत नाही, कामातून दिसते”; अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करत निलेश राणेंचा ठाकरेंना टोला

मुंबई : आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 20 धावांची गरज होती. अशा स्थितीत रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी दिली.अर्जुनने देखील आपला करिष्मा दाखवत रोहितचा विश्वास कायम ठेवला आणि स्वतःला सिद्ध करत मुंबईला विजय मिळवून दिला. एकीकडे अर्जुनच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याच्या कामगिरीचा आधार घेत भाजप नेते निलेश राणे यांनी राजकीय चिमटा काढला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी अर्जुन तेंडुलकर याच्या कालच्या आयपीएलमधील खेळीविषयी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी अर्जुनचे कौतुक तर केलेच आहे पण त्यासोबत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये,” काल अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनत करून पहिली विकेट घेतली. सचिन तेंडुलकरने क्रिकेट मधून संन्यास होताना मला सांभाळला आता अर्जुनला पण सांभाळा असं म्हटलं नव्हतं, कर्तुत्वाला ओळख सांगावी लागत नाही, कामातून दिसत असते. जय महाराष्ट्र.” असे म्हटले आहे.
काल अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनत करून पहिली विकेट घेतली. सचिन तेंडुलकरने क्रिकेट मधून संन्यास होताना मला सांभाळला आता अर्जुनला पण सांभाळा असं म्हटलं नव्हतं,
कर्तुत्वाला ओळख सांगावी लागत नाही, कामातून दिसत असते.
जय महाराष्ट्र.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 19, 2023
याचा संदर्भ त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाशी जोडला आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे शेवटचे भाषण केले त्यावेळी त्यांनी “मला सांभाळलत,उध्दवला सांभाळा, आदित्यला सांभाळा असे म्हटले होते. त्याच अनुशंघाने आज निलेश राणे यांनी सचिन आणि अर्जुन तेंडुलकरविषयी ट्विट केले. मात्र त्यांचा अप्रत्यक्षपणे रोख हा ठाकरे कुटुंबाकडे असल्याचे म्हटले दिसून येत आहे. त्यांच्या या ट्विटवर आता ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.





