तुकोबांची मोरोपंतांच्या कर्मभूमीतील मनमोहक क्षणचित्रे

बारामती : दौंड तालुक्यातील अवघड रोटी घाट ओलांडून उंडवडी येथे एक दिवसाच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा बारामतीच्या दिशेने निघाला. पाटस रस्त्यावरून बारामती शहराकडे वारकऱ्यांची पावले झपाझप पडत होती. बारामती शहरातील पाटस रस्ता येथे पालखी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती, त्यानंतर शहरात वैष्णवांचा मेळा दाखल होताच बारामतीकरांसह वारकऱ्यांचाही उत्साह दुणावला. शहरातील तांदूळवाडी वेस व कचेरी रस्ता मार्गे भिगवण चौकातून टाळ-मृदंगाच्या जयघोषात पालखी सोहळा शारदा प्रांगणात विसावला. समाज आरतीनंतर दर्शनरांगा सुरू करण्यात आल्या. बारामती शहर आणि परिसरात वाकऱ्यांची मांदियाळी दिसू लागली होती. शहर तसेच पंचक्रोशीत भगव्या पताका डोलताना दिसत होत्या. संध्याकाळ नंतर दिंड्यांतून सुरू झालेल्या भजनांमुळे वातावरण भारावून केले होते. टाळ, मृदंगाचा आवाज सर्वत्र घुमत होता.










