Women Team India Squad : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूचा पत्ता कट
महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय महिला क्रिकेट संघ (Women Team India Squad) आता एका नव्या आणि महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.

Women Team India Squad : महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय महिला क्रिकेट संघ (Women Team India Squad) आता एका नव्या आणि महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. जपानमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आगामी आशियाई खेळ 2026 साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने १५ सदस्यीय अधिकृत संघाची घोषणा केली आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाची (Women Team India Squad) कमान अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडेच सोपवण्यात आली असून, फॉर्मात असलेली स्टार फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून तिची साथ दिसेल.
या स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता (डिफेंडिंग चॅम्पियन) म्हणून मैदानात उतरणार आहे. २०२३ मध्ये चीनच्या हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई खेळांच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या मोसमात हे जेतेपद आणि सुवर्णपदक स्वतःकडेच राखण्याचे मोठे आव्हान कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या संपूर्ण ब्रिगेडसमोर असणार आहे.
एकूण ८ देशांमध्ये खेळली जाणारी ही प्रतिष्ठेची स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यंदा विजेतेपद कायम ठेवण्यासाठी निवडकर्त्यांनी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा एक उत्तम मेळ घातला आहे.
संघाच्या मुख्य (Women Team India Squad) फलंदाजीची धुरा स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर आणि हुकमी यष्टिरक्षक ऋचा घोष यांच्यावर असेल. त्याच वेळी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या जी. कमलिनी, भारती फुलमाळी, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा या युवा खेळाडूंना थेट मुख्य संघात स्थान देऊन निवड समितीने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.
दुसरीकडे, भारताची हुकमी अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटील हिचा या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला असला, तरी तिच्या निवडीवर सध्या थोडा सस्पेन्स कायम आहे. श्रेयांकाची जपानवारी पूर्णपणे तिच्या फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असेल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) मेडिकल टीमने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच ती जपानला रवाना होऊ शकेल.
याशिवाय, नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा नियमित भाग असलेली यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया हिला या संघातून वगळण्यात आले आहे. आशियाई खेळांसाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळालेली ती एकमेव खेळाडू ठरली असून, तिच्या जागी नवोदित जी. कमलिनी हिची यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे.
🚨 News 🚨
India Women’s squad announced for the 2026 #AsianGames in September.
More Details ▶️ https://t.co/JagEsizajH#TeamIndia pic.twitter.com/jJGddVSr17
— BCCI Women (@BCCIWomen) June 30, 2026
सामने केव्हा आणि कुठे होणार?
जपानच्या आयची-नागोया येथे होणाऱ्या या आशियाई खेळांमधील महिला क्रिकेटचे सामने १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत खेळवले जाणार आहेत. हे सर्व हाय-व्होल्टेज सामने नागोया येथील देखण्या ‘कोरोजी स्पोर्ट्स पार्क’ मैदानावर रंगतील.
एशियन गेम्स 2026 साठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाळी, श्री चरणी, रेणुका ठाकूर सिंग, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील*, राधा यादव आणि नंदनी शर्मा.






