केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

पुणे(प्रतिनिधी) – केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. संबंधीत महिलेच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणाची समर्थ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
यासना मुकेश बकसानी(36,रा.वानवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच रविवारी सकाळी एका नेपाळी दांम्पत्याने आत्महत्या केली होती.
यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले, संबंधीत महिलेच्या मुलावर रुग्णालयात किडणी आणी मधुमेहाच्या आजारावर उपचार सुरु होते. मागील तीन ते चार वर्षापासून त्यांचा मुलगा येथे उपचार घेत होता. त्यांचा मुलगा रुग्णालयाच्या डायमंड जुबली इमारतीतील पाचव्या मजल्यावर वॉर्ड क्रमांक सहामध्ये उपचार घेत होता. पहाटे साडेचारच्या सुमारास यासना यांनी वॉर्ड क्रमांक सहाच्या मोकळ्या जागेतून उडीमारुन आत्महत्या केली. याची खबर तातडीने रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला.
यासिन यांच्या पतीचे तीन महिण्यापुर्वीच कॅन्सरने निधन झाले आहे. तर 13 वर्षाच्या मुलावर किडणी आणी मधुमेहाचे उपचार मागील काही वर्षे सुरु आहेत. या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यावर त्याच्या देखभालीसाठी त्या तेथे रहात होत्या.
त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोटस लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरु नये. माझ्या दोन्ही मुलांचा ताबा भावाकडे देण्यात यावा. तसेच पती आणी माझ्या विम्याची रक्कम दोन्ही मुलांमध्ये ती मोठी झाल्यावर समसमप्रमाणात वाटून द्यावी असे म्हटले आहे.





