Pune : १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची करोडो रुपयांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे – गुंतवणूकीवर १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची एक कोटी चार लाख २५ हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पती -पत्नीसह तिघांवर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिंपळे निलख येथे रहाणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार शिवाजी शिंदे (डिएसके विद्यानगरी, सुस पाषाण), प्रियांका शिंदे (रा.धानोर, आष्टी) आणि मधुरा रोहन नंदुर्गी( ३६,रा.वाकड ) यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता ३१६, ३१८(४) आणि ३(५) या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिलेस आरोपींनी त्यांच्या स्क्रिसपिका अकॅडमी सर्व्हिसेस प्रा. लि. आणि पीएससीआय टेक या कंपण्यांमध्ये गुंतवणूक केल्यास १८ टक्के परतावा मिळेल असे सांगितले होते. त्यानूसार त्यांनी १ कोटी २४ लाख ४४ हजार रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरुपात दिले.
तसेच १३ तोळे सोन्याचे दागिने विकून ६ लाख १४ हजार आणि ६० हजाराचा डेल कंपनीचा लॅपटॉप असे १ कोटी ३१ लाख ८८ हजार रुपये गुंतवले. त्याच्या मोबदल्यात २७ लाख ६३ हजार रुपये परतावा म्हणून देण्यात आले. उर्वरीत मोबदला आणि गुंतवणूक केलेली रक्कम न देता १ कोटी चार लाख २५ हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके करत आहेत.





