खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

पुणे : शहर पोलिस दलात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. पुणे पोलिस दलातील गणेश अशोक जगताप या कर्मचाऱ्याने एका ५१ वर्षीय महिलेची तब्बल ७३.५ तोळे सोने आणि १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगताप आणि फिर्यादी महिला पूर्वीपासून ओळखीचे होते. हीच ओळख वापरत, जगताप यांनी “मी पोलिस खात्यात असल्याने माझ्या नावावर कर्ज मिळत नाही”, “माझ्याकडे ५ किलो सोने आहे, जे दुकानात गहाण आहे”, तसेच “लवकरच माझ्या नावावरील जमिनीचा व्यवहार होणार आहे; त्यातून सर्व पैसे व दागिने परत करीन” अशा विविध कारणांवर विश्वास बसवून महिलेच्या कुटुंबाकडून लाखो रुपये आणि सोने घेतले.
महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, जगताप यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये २४.६ तोळे, तर जानेवारी २०२० मध्ये ४८.९ तोळे असे मिळून एकूण ७३.५ तोळे सोने घेतले. त्याचप्रमाणे फिर्यादी महिला, तिचे पती आणि मुलाकडून वेळोवेळी रोख रक्कम व धनादेशही घेतले.
सध्या फिर्यादी महिलेच्या पैशांची आणि दागिन्यांची परतफेड झाली नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.
आणखी एक सराफी व्यावसायिकालाही फसवले
२१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप यांची बदली पोलिस मुख्यालयातील विशेष शाखेत झाली होती. मात्र ते तिथे अनुपस्थित राहिले आणि दरम्यान औंध येथील एका सराफी व्यावसायिकालाही त्यांनी गंडवले. वरिष्ठ अधिकाऱ्याचे खोटे नाव सांगत ८.२२ लाख रुपयांचे दागिने घेतले आणि पैसे मागितल्यावर सराफाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर तत्कालीन विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांचे निलंबन केले.
राष्ट्रपती पदकासाठी बनावट कागदपत्रांचा वापर
जगताप यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप म्हणजे त्यांनी २०२१ मध्ये राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक केली होती. त्यांनी सेवा पुस्तकातील नोंदी बनावट करून, खोटे दस्त तयार केले. त्यावर बनावट सह्या व शिक्के लावून वेतनवाढीशी संबंधित नोंदी नष्ट केल्या. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात जगतापसह दोन लिपिकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.





