राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीतून माघार घ्या; प्रकाश आंबेडकरांचे यशवंत सिंन्हांना आवाहन

मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीतून माघार घ्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना केले आहे. देशभरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील अनेक लोकांनी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी या निवडणूकीतून माघार घ्यावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. तर मतमोजणी गुरुवारी होणार आहे. कॉंग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना, समाजवादी पार्टीचा सहकारी पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि “राजद’चा मित्र पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्च्याने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव यांनीही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
याशिवाय वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल आणि शिरोमणी अकाली दलाने यापूर्वीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आणि ओडिशाच्या माजी मंत्री आहेत. जर त्या निवडून आल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरतील. तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरतील. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी या निवडणूकीतून माघार घ्यावी अशी त्यांना आपली विनंती असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.





