पुणे जिल्हा | उन्हाच्या झळांसोबत प्रचाराचे रण तापले

वडापुरी, (वार्ताहर) – एकीकडे महाविकास आघाडी व महायुती यांची बारामती लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध जोरदार रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणार्या ठरत आहेत.
मार्चअखेर कमाल तापमान 39 अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक तसेच कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे. उन्हाच्या झळा जीव लाहीलाही करणार्या ठरत आहेत. वाढते ऊन तापदायक ठरत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीचा फडही सजला आहे. लोकसभा निवडणूक घोषित झाली आहे.
देशात सात टप्प्यांत, तर राज्यात पाच टप्प्यांत या निवडणुकीचे मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे तिसर्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केले आहे.
बारामतीची जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस तसेच मित्र कोपरा सभा व एकत्रित मेळाव्याकडे तसेच मतदारांच्या थेट भेटी घेण्यात व्यस्त आहेत. तर बारामती जिंकायचीच या उद्देशाने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जोरदार हालचाली सुरू असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे उन्हाचा वाढता तडाखा असताना प्रचाराचे रण अधिकच तापवणारा ठरणार आहे.
दुपारी मोठ्या प्रमाणावर ऊन असल्यामुळे भल्या पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात केली जात आहे. दुपारी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा प्रचार केला जात आहे. भर उन्हातही युतीचे कार्यकर्ते घरोघरी फिरून केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवित आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाचा तडाखा अधिकच वाढणार आहे. अशा परिस्थितीत प्रचारासाठी घराबाहेर पडताना कार्यकर्त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
टोप्या, उपरणे आणि छत्र्या
वाढते ऊन लक्षात घेता, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना टोप्या, उपरणे उपलब्ध करून दिले आहेत. या टोप्या तसेच उपरण्यांवरच पक्षाचे नाव, चिन्ह नमूद करण्यात आले आहे.
या टोप्या, उपरणांद्वारेही प्रचाराची संधी राजकीय पक्षांनी सोडलेली नाही. उन्हापासून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या ध्वजाच्या रंगांच्या छत्र्या तयार केल्या असून, या छत्र्यांवरही राजकीय पक्षांची चिन्हे छापण्यात आली आहेत.





