राजगुरूनगरात यंदा आधीच सुचले शहाणपण

राजगुरूनगर -गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत थोडक्यात वाचलेल्या केदारेश्वर बंधाऱ्याचे यावर्षी पूर परिस्थिती अगोदर ढापे काढले आहेत. त्यामुळे यावर्षी अतिवृष्टी झाल्यास पूल नादुरुस्त होण्याच्या धोका टळणार आहे. पुलाचे ढापे काढल्याने पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याला मार्ग मिळणार आहे. गेल्या वर्षाच्या अनुभवामुळे प्रशासनास यंदा आधीच शहाणपण सुचले असले तरी पावसाने मात्र ठेंगाच दाखवला आहे.
राजगुरूनगर शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा जुना झाला आहे. हा बंधारा गेली सुमारे 30 जास्त वर्षे भीमानदीला येणाऱ्या पुराचा सामना करीत अजूनही शाबूत आहे. गेली अनेक वर्षे या पुलाचे ढापे पावसाळ्यात काढले जात नव्हते. त्यामुळे पावसाळ्यात भीमा नदीच्या पुरात राजगुरूनगर शहराला पाणीपुरवठा करणारा हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तग धरून आहे. मात्र, या बंधाऱ्याच्या देखरेखीकडे मोठे दुर्लक्ष आहे. वर्षानुवर्षे तो जीर्ण होत चालला आहे. त्याची विशेष दुरुस्तीकडे नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे असले तरी ते देताना दिसत नाही.
जवळपास दरवर्षीच भीमानदीला महापूर येतो. तरी केदारेश्वर बंधाऱ्याचे ढापे काढले जात नव्हते. त्यामुळे नदीला पाणी बंधाऱ्यावरून पूर्ण क्षमतेने जात होते या बंधाऱ्याचा राजगुरूनगर बाजूकडील भराव दरवर्षी वाहून जातो तो पुन्हा दुरुस्त करण्यासाठी लाखो रुपयांचा आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे. मागील वर्षी दि. 1 ते 4 सप्टेंबरपर्यंत भीमाशंकर, भोरगिरी परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी झाली होती.
त्यामुळे दि 4 सप्टेंबर रोजी चासकमान धरणातून सर्वाधिक सुमारे 56 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने भीमानदीला महापूर आला होता यात या बंधाऱ्याचे ढापे न काढल्याने केदारेश्वर बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला होता. तर बाजूचा भराव वाहून गेला होता. गेल्या वर्षाची ही परिस्थिती लक्षात घेत नगरपरिषदेने यावेळी बंधाऱ्याचे दुसऱ्या स्तरापर्यंत ढापे काढून पुराचा प्रवाह पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वच्छ पाणीसाठा होण्याची आशा
राजगुरूनगर येथील केदारेश्वर बंधाऱ्याचे पावसाळ्यापूर्वी ढापे काढले नसल्याने या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. बंधाऱ्याची खोली कमी झाली आहे. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे ती वाहून न गेल्याने उन्ह्याळात दुर्गंधी युक्त पाणी नागरिकांना प्यावे लागत होते. ढापे काढल्याने मोठ्या पुरात बंधाऱ्यातील घाण आणि गाळ खाली वाहून जाणार असल्याने पुढील काळात जास्त आणि स्वच्छ पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे.





