विप्रोचा नफा 26% वाढला, पण व्यापार युद्धामुळे महसूल घटण्याची भीती

बंगळूरु – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीने जानेवारी ते मार्च या तिसर्या तिमाईचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार कंपनीचा नफा 26 टक्क्यांनी वाढून 3,569 कोटी रुपये इतका झाला आहे. मात्र जागतिक व्यापार युद्धामुळे आगामी तिमाही मध्ये कंपनीचा महसूल कमी होऊ शकतो असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
व्यापार युद्धामुळे देशांतर्गत आणि परकीय अर्थव्यवस्थाचे स्वरूप बदलणार आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तिसर्या तिमाहीत नफा समाधानकारक पातळीवर नेण्यात आम्हाला यश मिळाले असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
अमेरिकेने आयातीबाबत धरसोड धोरण चालू ठेवले आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना निर्यात करणार्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना आपले धोरण ठरवितांना अडचणी येत आहेत. विप्रोचा बराच महसूल अमेरिकेतून येतो. मात्र अमेरिकेत मंदी निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. याचा परिणाम भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरही होत असल्याचे सांगण्यात आले.
चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल दीड टक्क्यांनीे वाढून 22,504 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहित कंपनीचा महसूल 22,208 कोटी रुपये इतका होता. सरलेल्या पूर्ण वर्षात कंपनीचा नफा 18.9 टक्क्यांनी वाढून 13,135 कोटी रुपये झाला आहे. तर महसूल 0.74 टक्क्यांनी कमी होऊन 89,088 कोटी रुपये इतका झाला आहे. या तिमाहीचा आणि वार्षिक ताळीबंद जरी समाधानकारक असला तरी कंपनीच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब म्हणजे आगामी काळामध्ये हा महसूल आणि नफा व्यापार युद्धामुळे कमी होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत कंपनी जागतीक घडामोडीकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. या तिमाहीत कंपनीच्या कर्मचार्यांची संख्या काही प्रमाणात वाढून 2,33,346 इतकी झाली आहे. कंपनीकडे सध्या 5.4 अब्ज डॉलरच्या ऑर्डर आहेत. त्यामुळे किमान दोन तिमाहीत तरी कंपनीच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होणार नाही.





