Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

बीजिंग : विफा या सागरी वादळाचा चीनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला फटका बसण्याची भीती आहे. हे वादळ फिलिपिन्सला ओलांडून आता चीनच्या दक्षिणेकडील भागाकडे सरकते आहे. या वादळामुळे तैवानमधील विमान आणि सागरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिलाच्या उत्तरेकडील क्विझोन शहरात एका ट्रकवर भला मोठा जाहिरातीचा फलक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला.
विफा चक्रिवादळामुळे ताशी १०१ किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहू लागले आहेत. तर वादळातील सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग ताशी १२६ किलोमीटर इतका असून हे वादळ शनिवारी तैवानच्या दक्षिणेकडे सरकले आहे, असे तैवानच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तैवानच्या पूर्व किनाऱ्यावरील हुआलियन आणि तैतुंग काउंटीमध्ये शनिवारी २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. खवळलेला समुद्र आणि जोरदार वाऱ्यांमुळे देशांतर्गत विमानांची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आणि १४ फेरी मार्गांवरील सेवा निलंबित करण्यात आली. तैवान सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला, चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील फुजियान प्रांतात अनेक फेरींनी सेवा स्थगित केली.
व्हिएतनाममध्ये प्रवासी बोट उलटली
व्हिएतनाममध्ये शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळात एक पर्यटक बोट उलटली. या दुर्घटनेत किमान १८ जणांचा मृत्यू झाला आणि जवळजवळ दोन डझन लोक बेपत्ता झाले, असे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. या लाकडी बोटीमध्ये ४८ प्रवासी होते. बचाव कर्मचाऱ्यांनी १२ जणांना वाचवले आणि बोट उलटलेल्या ठिकाणाजवळून १८ मृतदेह बाहेर काढले. बोटीखाली अडकलेल्या १४ वर्षांच्या मुलाला ४ तासांच्या प्रयत्नांनंतर वाचवण्यात यश आले. विफा वादळ पुढील आठवड्यात व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात हा लॉन्ग बेच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.





