विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणत्या मुद्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?

Maharashtra Assembly Winter Session : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस सरकारचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडला. आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील विदर्भासह जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे. त्यातही निवडणुकीत मिळालेल्या बंपर यशामुळे सरकार कुठलेही निर्णय घेताना हात आखडता घेणार नाही, अशी जनतेला अपेक्षा आहे. सरकारने लोकहिताचे व विकासाचे मोठे निर्णय घेऊन राज्याच्या प्रगतीचा आलेख वाढवावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
कोणत्या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरणार ?
ईव्हीएम, कायदा सुव्यवस्था, परभणी हिंसाचार, बीडमधील सरपंच हत्या प्रकरण, मंदिरांना नोटीस, लाडकी बहीण योजना, रोजगार, शेतकऱ्यांचा प्रश्नावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असतील.
या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत 20 विधयेके मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.
तर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापाण्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. “विदर्भात केवळ आठवडाभराचे अधिवेशन घेऊन महायुती सरकार देखावा करत असल्याची टीका विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत केली. विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील – फडणवीस
दुसरीकडे, महायुतीच्या मंत्र्यांच्या राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सायंकाळी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रपरिषदेत हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
Vijay Hazare Trophy 2024/25 : मोहम्मद शमीचा बंगालच्या संघात समावेश, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद कायम…





