Virat Kohli and Rohit Sharma : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या भविष्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. टीम इंडियाला या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे, जिथे तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली मालिका असणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यानंतर गंभीरने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि यादरम्यान त्याने अनेक खडतर प्रश्नांची उत्तरेही दिली.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्याच्या प्रश्नावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, “विराट आणि रोहित यांनी मोठ्या मंचावर नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मग टी-20 विश्वचषक असो की मग एकदिवसीय विश्वचषक. एक गोष्ट मी स्पष्ट करतो की, त्यांना अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका सुध्दा…! यामध्ये रोहित-विराटची संघाला खूप गरज असेल. ते इतर सहकारी खेळाडूंना प्रेरणा देतील यात शंका नाही. त्यांचा फिटनेस चांगला आणि कायम असेल आणि त्यांना वाटत असेल तर ते नक्कीच 2027 च्या विश्वचषकात खेळताना दिसू शकतात.”
SL vs IND : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत दिसले ‘हे’ खेळाडू..
विराट कोहली आणि रोहित शर्मासह रवींद्र जडेजाने नुकत्याच संपलेल्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी तिघेही उर्वरित दोन फॉरमॅट खेळत राहणार आहेत. असे असले तरी विराट आणि रोहितच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, हे दोघेही तंदुरुस्त राहिल्यास 2027 च्या विश्वचषकातही ते खेळताना दिसू शकतात, असे मुख्य प्रशिक्षक गंभीरने स्पष्ट केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळवली जाणार आहे आणि त्याशिवाय 2025 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे.