श्रीलंकेत सरकार बदलणार? अध्यक्ष गोटाभाये राजपक्षे राजीनामा देण्याच्या तयारीत ?

कोलोंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाभाये राजपक्षे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. त्यातच तीन मंत्र्यांनीही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच 225 सदस्यांच्या संसदेतील संसदेतील सरकारच्या बाजूच्या 156 खासदारांपैकी 39 जणांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. सरकारमधून बाहेर पडलेल्या खासदारांनी अन्य कोणत्याही गटामध्ये सामील न होता अपक्ष म्हणून संसदेत बसण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान अध्यक्ष गोटाभाये राजपक्षे हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे संसदेतील विरोधी पक्ष नेते सजित प्रेमदासा यांनी म्हटले आहे. संसदेचे सभापती महिंदा यापा अबेयवर्दने यांच्या हवाल्याने प्रेमदासा यांनी ही माहिती दिली आहे. जर सर्व राजकीय पक्षांनी आपल्याला पद सोडण्याची विनंती केली तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे राजपक्षेंचे म्हणणे आहे, असे अबेयवर्दने यांनी सांगितले.
मात्र एका अन्य माध्यमाशी बोलताना अबेयवर्दने यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. जर कोणात्या पक्षाकडे बहुमत असेल तर अध्यक्ष सत्ता हस्तांतरित करण्यास तयार आहेत, असे स्पष्टिकरण त्यांनी दिले.




