Sharad Pawar : ‘तुतारी’चा सूर बदलणार? पंतप्रधान मोदी आणि पवार गटाच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?
Sharad Pawar : पवारांची 'तुतारी' आता कोणत्या दिशेने वाजणार?

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव राजकीय समीकरणं बदलण्यासाठी अनेकदा ओळखलं जातं. त्यामुळेच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील प्रत्येक भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष जाणं स्वाभाविक आहे.
काही आठवड्यांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मोदींसोबत झालेली भेट, त्यानंतर शरद पवार गटाच्या आठही खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेणं आणि त्याचवेळी शरद पवार गटाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चा यामुळे यामुळे काहीतरी शिजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे, मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर अवघ्या २० दिवसांत शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी २२ जुलै रोजी नीट परीक्षेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पंतप्रधानांची भेट घेतली होती.
सुमारे १५ ते २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत राजकीय भाष्य टाळून महाराष्ट्रातील प्रलंबित विकासकामे, शेतकरी प्रश्न आणि मतदारसंघातील कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मागणी केली. शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान यांचा सन्मान केला, असेही मोदींच्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी सांगितले.
मात्र राजकारणात भेटीचा अधिकृत अजेंडा आणि त्यातून निर्माण होणारा राजकीय संदेश या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पवारांची शैली पाहता केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी संवादाचे दरवाजे बंद न ठेवणं ही त्यांच्या राजकारणाची जुनी पद्धत राहिली आहे.
शेतकरी, केंद्र-राज्य संबंध किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नांवर थेट पंतप्रधानांशी चर्चा करण्याचा फायदा राज्याच्या राजकारणातही होऊ शकतो. पण दुसरी बाजूही महत्त्वाची आहे. शरद पवारांचा पक्ष सध्या इंडिया आघाडीचा भाग आहे. अशा परिस्थितीत पवार कुटुंबातील नेत्यांच्या मोदींसोबतच्या वाढत्या संपर्कामुळे काँग्रेससह मित्रपक्षांमध्येही प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. मात्र यावर मित्रपक्षांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
मित्रपक्षांची सावध प्रतिक्रिया
यावर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “राजकारणात एखादी घटना घडते तेव्हा त्यामागे काहीतरी वेगळा संदर्भ असतो. कोण कोणाला भेटत आहे, कशासाठी भेटत आहे, याबाबत वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मात्र त्या भेटीचा खरा अजेंडा काय आहे, हे त्यांनाच माहिती असते.
काही भेटी उघडपणे होतात, तर अनेक भेटी गुप्तपणे होतात आणि त्याची माहिती बाहेर येत नाही. सत्तापक्षातील आमचे जुने मित्र सांगतात की, आम्ही उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, आता राष्ट्रवादी फोडणार,” असा मोठा दावा चव्हाण यांनी केला आहे.
तर खासदार संजय राऊत म्हणाले की, “अधिवेशन सुरु असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटणं यात आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना याचसाठी भेटावं लागतंय कारण ते संसदेत नाहीत. ते काही लपूनछपून भेटत नाहीत. सुप्रिया सुळे सोबत आहेत. मला वाटत नाही पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पक्ष एनडीएला मदत होईल, अशी भूमिका घेतील.
याच पार्श्वभूमीवर डिलिमिटेशनचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. आगामी मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित संभाव्य घटनादुरुस्तीबाबत केंद्राला संसदेत व्यापक पाठिंबा आवश्यक ठरू शकतो. त्यामुळेच या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय समीकरणांची पूर्वतयारी का?
सर्वात आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेली फूट, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेलं बंड, नुकतीच ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदे गटात केलेली एन्ट्री या घटना पाहता शरद पवारांच्या खासदारांनी घेतलेली मोदींची भेट महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आहेत की भविष्यातील राजकीय समीकरणांची पूर्वतयारी का? याचं उत्तर आज स्पष्टपणे कुणाकडे नाही.
पण एक गोष्ट मात्र निश्चित… पवारांची राजकारणातील सर्वात मोठी ताकद म्हणजे कोणाशी संवाद ठेवायचा आणि कोणता पर्याय कधी उघडा ठेवायचा यावर असलेले नियंत्रण… त्यामुळे आता मोदींच्या भेटीनंतर पवारांची तुतारी कोणत्या दिशेने वाजणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
हेही वाचा:






