तुरुंगातील मुक्काम वाढणार कि सुटका होणार ? केजरीवाल यांचा आज होणार फैसला..

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय आज (मंगळवार) दिल्ली उच्च न्यायालय जाहीर करणार आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ती कारवाई ईडीने २१ मार्च यादिवशी केली. त्या अटकेला केजरीवाल यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले. अटकेची कारवाई राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन करणारी असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
तसेच, निवडणूक काळात झालेल्या अटकेच्या टायमिंगविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांच्या याचिकेवर उद्या दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास फैसला सुनावला जाणार आहे. अटकेनंतर केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरूंगात झाली आहे.
केजरीवालांच्या अटकेनंतर दिल्लीत राजकरण चांगलेच तापले आहे. दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय उपोषणासह विविध मार्गानी केजरीवालांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरूच ठेवली आहेत. भाजप आम्हाला देखील तपास यंत्रणांचा धाक दाखवत असल्याचा आरोप आप नेत्या अतिशी यांनी केला आहे. अशात आता न्यायालय केजरीवालांबाबत नेमकं काय निर्णय देणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.





