आता तरी कर्मचारी वेळा पाळणार का?

पाच दिवसांचा आठवडा : वेळेत येणे, लवकर “कलटी’ मारणे बंद होणार का?
पुणे : केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयातही पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तर रोजच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. मात्र, “वेळ’ आणि “शासकीय कर्मचारी’ यांचा ताळमेळ कधी लागलाच नाही.
बहुतांश शासकीय कार्यालयातील कर्मचारी वेळेत येत नसल्याचे दिसून येते; तर वेळेच्या आधीच कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे कामकाजाची वाढविण्यात आलेली वेळ हे कर्मचारी कितपत पाळणार याबाबतची शाश्वती नाही. पुणे जिल्हा परिषदेमध्येही असेच काही चित्र असून, कर्मचाऱ्यांनी वेळेत यावे असे वाटत असेल तर “बायोमेट्रिक’ हजेरी होणे आवश्यक आहे.
विविध शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी दहा ते सहा अशी आहे. मात्र, येत्या 29 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसांच्या आठवड्यामुळे त्यांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवली आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बैठकीचे आयोजन करून कामकाजाची बदलेली वेळ, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी किती वाजता यावे यासह आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेमध्ये येत्या दोन दिवसांत सीईओ बैठक घेऊन याबाबत सूचना देणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेस पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये हजारच्या पटीत कर्मचाऱ्यांची संख्या आहे. मात्र, यातील काही कर्मचारी वेळेत कधीच येत नसतात. तर वेळेच्या आधीच कार्यालयातून बाहेर पडत असल्याचे चित्र अनेकवेळा दिसून येते. सुट्टीचा दिवस आल्यावर आदल्यादिवशी कर्मचारी अर्धा ते एक तास आधीच “कलटी’ मारतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लागली तरच कर्मचारी वेळेत येतील आणि कामांना गती मिळेल.
बायोमेट्रिक हजेरीमुळे नियम मोडणाऱ्यांना आळा
पाच दिवसांच्या आठवड्यामुळे आता पुणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना पावणेदहा वाजताच कार्यालयात यावे लागणार आहे. तर सव्वासहानंतर सुट्टी होणार. मात्र, काही कर्मचारी आणि अधिकारी या वेळेचे कधीच पालन करत नाही. त्यामुळे फाईलींचा ढीग साचतो. वेळेत कामे होत नाही. कर्मचारी जागेवर नसल्यामुळे मुख्य कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये आलेल्या व्यक्तींना निराश होवून माघारी जावे लागते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लागावी यासाठी बायोमेट्रिक हजेरी होणे आवश्यक आहे. या आधी मस्टर असल्यामुळे उशीर येऊनही कर्मचारी वेळेत आल्याचे दाखवितो. मात्र, बायोमेट्रिक हजेरीमुळे नियम मोडणाऱ्यांना आळा बसेल.





