Sanjay Raut : बंडखोर खासदार ठाकरे गटात जाणार? राऊतांच्या विधानामुळे संकेत, अमित शाहांच नाव घेत म्हणाले…
Sanjay Raut : या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधील नऊ खासदारांपैकी सहा खासदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यापैकी धाराशिवचे खासदार ओमराजे यांनी आपली भूमिका मतदारसंघात गेल्यावर जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या चर्चांवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, संबंधित खासदार तांत्रिकदृष्ट्या अद्याप शिवसेनेतच आहेत आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणतेही अधिकृत निर्देश आलेले नाहीत. तसेच या खासदारांनी अद्याप पक्ष सोडल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
राऊतांचा मोठा दावा
उबाठा गटाचे फुटीर खासदार नेमके कुठे आहेत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांना जयपूरमधील एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी दावा केला की, काही खासदारांशी संपर्क सुरू असून ते सध्या त्यांच्या मतदारसंघात जाण्यासही संकोच करत आहेत. उद्धव ठाकरे यांचे आगामी दौरेही नियोजित असून विविध जिल्ह्यांमध्ये सभा आणि भेटीगाठी होणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. एकूणच, या संभाव्य घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा : Pune-Bengaluru Highway Accident: साताऱ्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; अपघातात 2 जणांचा मृत्यू
अमित शाहांवर जहरी टीका
अमित शाहा हे व्यापारी आहे. शेअरमध्ये पैसा गुंतवणे आणि कुत्रिम भाव वाढवून पैसा कमावणे हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. बाकी सहकार हे ढोंग आहे. त्यांनी या देशात अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतली, अशा शब्दांत जहरी टीका केली.
शाह मोदींविरोधात बंड करून घेऊ शकतात
खासदार, प्रादेशिक पक्ष फोडून भविष्यात मोदींना आव्हान देण्याचं षडयंत्र आहे. मोदींना आव्हान देण्याच्या षडयंत्रात एकनाथ शिंदेंना शामिल करून घेतले. या खासदारांच्या विरोधात उद्या शाह मोदींविरोधात बंड करून घेऊ शकतात, असाही खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यावर आता भाजप आणि शिंदेगटाकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर? म्हणाले…






