नवे आयुक्त पाणी कपातीचे संकट मिटविणार का?

पिंपर -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवारी पदभार घेतला आहे. शहरावर पाणी कपात लादण्यात आल्यानंतर शेखर सिंह हे तिसरे आयुक्त आहेत. सिंह तरी शहरवासीयांवर लादण्यात आलेले पाणी कपातीचे संकट मिटवू शकतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकरांच्या काळात शहरावर दिवसाआड पाणी कपात लादण्यात आली. हर्डीकरांनी सांगितले होते की पाणी कपात जास्त काळासाठी राहणार नाही. हर्डीकरांनतर राजेश पाटील यांनी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी देखील नियमित पाणी पुरवठ्याच्या अनेक तारखा दिल्या. परंतु नियमित पाणी पुरवठा होऊ शकला नाही. आता शेखर सिंह आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. किमान त्यांच्या काळात तरी पाणीपुरवठा नियमित होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने पाणी पुरवठा सुरळीत करणे, पंतप्रधान आवास योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करणे, अतिक्रमण निर्मूलन, अतिक्रमणांना प्रतिबंध घालणे सारखी अनेक प्रलंबित कामे आहेत.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी (दि.18) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी यापूर्वी ग्रामीण भागात काम केले आहे. त्यांची महापालिकेमध्ये प्रथमच नियुक्ती झाली आहे. त्यांना शहरी भागात काम करण्याचा अनुभव कमी असला तरी त्यांनी फील्डवर उतरून, नागरिकांच्या सूचनांची दखल घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शहराला गेल्या पावणेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. पाणी पुरवठा सुरळीत आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी लवकरात-लवकर कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हे आहेत शहरातील प्रश्न
पवना धरणातून अधिकचे पाणी आणणे, आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी आणणे, स्वच्छ शहर, स्मार्ट सिटी योजनेत स्थान उंचावणे, महापालिका निवडणूक प्रक्रिया निपक्षपातीपणे राबविणे, झोपडपट्ट्या नियंत्रणात ठेवून पुनर्वसन प्रकल्प राबविणे, पंतप्रधान आवास योजनेची कामे पूर्ण करणे, निगडी-रावेत बीआरटी मार्गासह अन्य प्रलंबित प्रकल्प पूणे करणे, ई-गव्हर्नन्स प्रणाली राबविताना लोकसहभाग वाढवणे, पार्किंग धोरण, रस्ते सफाई धोरण राबविणे, अतिक्रमण निर्मूलन व अतिक्रमाणांना प्रतिबंध घालणे, लाचखोरीचे ग्रहणातून महापालिका मुक्त करणे. महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्त लावणे.
=================





