Ajit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं…

पुणे : “मी मंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही,” अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मांडली. “अजित पवार पैसे सोडत नाही,” अशा आरोपांवर प्रत्युत्तर देताना, “मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का?” असा थेट सवाल करत अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालेवाडीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, “विरोधक लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, या विभागाला यंदा ४१ टक्क्यांनी जास्त निधी दिला आहे. त्यामुळे हा आरोप पूर्णतः निराधार आहे.”
अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “सर्व गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशांचं नाही. उत्पन्न वाढवण्यासाठी काही निर्णय घेणे अपरिहार्य असते.” त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि तरुण यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
भाजपसोबत युतीबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊन चालणारा पक्ष आहे. बहुमत न मिळाल्याने आम्हाला इतर पक्षांसोबत सत्ता स्थापन करावी लागली. भाजपसोबत ममता बॅनर्जी, नायडू, नितीश कुमार, मेहबुबा मुफ्तीही होते. विचारधारेशी कोणतीही तडजोड होणार नाही.”
जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडताना, अजित पवार म्हणाले, “एखाद्या समाजासाठी अर्थसंकल्पात निधी द्यायचा असेल, तर जनगणनेची आकडेवारी आवश्यक असते. म्हणूनच केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत, त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन करत, “या निवडणुकीत तरुणांना अधिकाधिक संधी दिली जाईल,” अशी ग्वाहीही दिली.





