पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार ? CM शिंदे अचानक दिल्लीला रवाना

मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु अद्याप दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. वर्षभरात अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या वाऱ्या केल्या. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी नेहमीच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली वारीसाठी रवाना झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर भेट झाली. यानंतर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठवडाभरात होईल अशी दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाच्या 15 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चाहूल मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीमुळे लागली आहे.
राज्यमंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी शपथ घेतली. यानंतर 9 ऑगस्टला 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. परंतु बहुप्रतिष्ठित दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि विरोधकांची नजर लागून राहिली आहे.
लवकरच लवकरच सांगत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार वर्ष झाले तरी झाला नाही. केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असे सांगितले जात आहे. मात्र पुढील आठवडाभरात केंद्रानंतर राज्य सरकारचाही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.





