Sugar Price : दिवाळीत घास कसा गोड लागणार, साखर महागणार? नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारकडे साखरेची किमान आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी केली आहे. महासंघाचे प्रबंध संचालक प्रकाश नारनवरे यांनी ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला पत्र लिहून साखरेचा भाव वाढविण्याची मागणी केली आहे.
सरकारने साखरेला ३१०० रूपये जाहीर केला आहे. मात्र, खर्चाच्या तुलनेत हा दर परवडत नसल्यामुळे साखरेला ३९०० रूपयाचा भाव जाहीर करावा. यामुळे, साखरेच्या बाजारभावातील किमतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा महासंघाने केला आहे.
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह देशाच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे उसाचे उत्पादन चांगले होणार आहे. याचा परिणाम २०२५-२६ या वर्षांत साखर निर्मितीवर होणार आहे. या वर्षांत ३५० लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातील 45 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल बनविण्यासाठी केला जाणार आहे. शिवाय, साखर निर्यात सुध्दा केली जाणार आहे.





