Pune : महापालिका निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढणार?

पुणे : मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे. मुंबई आमच्या हातून गेली, तर ती महाराष्ट्रापासून वेगळी होईल. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल, असा शब्दांत शिवसेना-ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढावे, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढलो, म्हणजे महाविकास आघाडी तुटली असे होत नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. मोठे बहुमत मिळालेल्या राज्य सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे १४ महापालिकांच्या निवडणुका ते लवकरच घेतील, असे अपेक्षित आहे. विधानसभेला लोकांनी लाखोंच्या संख्येने मतदान केले. पण, ते मतदान आम्हाला मिळालेले नाही अशी लोकांची भावना आहे. त्याचे पडसाद मारकडवाडीससह अन्य गावांमध्ये उमटले. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो.
या राज्यात काय चालले? सरकार स्थापन झाले तर मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. विस्तार झाला तर खातेवाटप होत नाही. बहुमत असताना खातेवाटप का करता येत नाही ? मग राज्य कसे चालणार? राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. खून, हत्या, बलात्कार होत आहेत. नागपूरला उपराजधानीचा दर्जा आहे. विदर्भाच्या प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशन विदर्भात घेतले. मात्र, पाच दिवसांत ते गुंडाळले जाते. अधिवेशन पूर्णकाळ चालवणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. तीही त्यांना जमत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
ज्याच्या हाती ईव्हीएम, त्याची लोकशाही
वर्षानुवर्षे आम्ही निवडणूका लढत आहोत. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने निवडणूका लढवल्या जातायत, ते गेल्या सत्तर वर्षांमध्ये कधी पाहिले नव्हते. ज्याच्या हाती ईव्हीएम, त्याची लोकशाही असे समीकरण झालेले आहे. त्यामुळे विधानसभा निकालावर चिंतन, मंथन करण्यापेक्षा आता पुढे जायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
फडणवीसांवर पलटवार
भारत जोडो यात्रेमध्ये अनेक निवृत्त आर्मी ऑफिसर, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मी स्वत:सहभागी झालो होतो. मग मी अर्बन नक्षलवादी आहे का? असा प्रश्न विचारत तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभवती कोण आहे हे फडणवीसांनी सांगावे, असा सवाल संजय राऊत यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेना फुटीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही टीका केली.





